देवीबद्दल माहिती

पूर्वी दक्षाने बृहस्पती सव नावाचा मोठा यज्ञ केला. या यज्ञाला भगवान शंकर यांना न बोलाविता सर्व देवांना बोलावले. शिवपत्नी सती या यज्ञाला आमंञण नसतांनाही गेली. यज्ञात शिवाला अविर्भाव दिला गेला नाही. त्यामुळे सतीने यज्ञात उडी घेतली. शंकरजींना हे कळाल्यानंतर त्यांनी यज्ञाचा विध्वंस केला. सतीचे कलेवर हातात घेऊन श्री शंकर ञिलोकात हिंडू लागले. ही स्थिती पाहुन विष्णुने सुदर्शन चक्र सोडले व सतीच्या शरीराचे ५१ तुकडे केले. हे तुकडे ५१ ठिकाणी पडले. हीच ५१ शक्तीपीठे म्हणुन गणली जाऊ लागली. महाराष्ट्रात शक्तीचे साडेतीन शक्तीपीठे आहेत. कोल्हापुरची महालक्ष्मी, तुळजापुरची महासरस्वती, माहुरची महाकाली आणि सप्तशृंग गडावरील सप्तशृंगी होय. परंतु आदिशक्तीचे मूळ स्थान सप्तशृंगी हेच होय. ओंकारातील मकार पूर्ण रूप होऊन सप्तशृंग गडावर स्थिरावला म्हणून हेच मूळ रूप आणि हिच आदिमाया. १८ हातांची ही महिषासुरमर्दीनी, ही श्री महालक्ष्मी देवी, हीच महाकाली, महासरस्वती होय. ञिगुणात्मक स्वरूपात आद्य स्वयंभू शक्तपीठ म्हणून श्री सप्तशृंगी देवीचा उल्लेख पौराणिक ग्रंथातून आढळतो.

श्री सप्तशृंग निवासिनीचे श्रेष्ठत्व स्पष्ट करणारे अनेक पौराणिक कथांतून तसेच विविध ग्रंथातून आढळतात. या ग्रंथांचा आधार घेऊन देवीच्या अलौकिक कर्तृत्वाचे, महतीचे विविध पैलू सहज स्पष्ट होतात.
फार प्राचीन काळी नारदॠषी स्वर्ग, मृत्यु व पाताळ अशा ञिभुवनात फिरता फिरता सत्यलोकात  जाऊन ब्रम्हदेवाकडे  गेले. त्यांना नमस्कार करून ते म्हणाले, हे पिता, ञिभुवनात पविञकारक व कल्याणदायी तीर्थ कोणते आहे ? तसेच सिध्ददायी देवता कोण ?

हाच प्रश्न कलयुगाच्या प्रारंभी नैमिषारण्य क्षेञात शौनकादी ॠषींनी सुतास विचारला असता त्यांना सुतांनी जे सांगितले तेच पूर्वी कृतयुगात ब्रम्हदेवांनी नारदॠषीस  सांगीतले आहे.

देव म्हणाले सर्व देवगणांची संघटीत शक्ती जिच्यात सामावली आहे. व जिने जग व्यापले आहे, तिला आम्ही वंदन करतो. देवी तू जगाचे पालन व भवसागराचा नाश कर. तु पुण्यवंताच्या घरात लक्ष्मी, दृष्टांच्या घरात दारीद्रय, ज्ञानियांच्या हृदयात बुध्दी, सज्जनात श्रध्दा तसेच कलावंताच्या हृदयात लज्जा अशा स्वरूपात असतेस. तुझ्या थोर पराक्रमाचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतील.  तू जगाचे मूळ कारण आहेस. सर्व जग तुझ्या अंश स्वरूपाने बनले आहे. परमात्मतत्वाचे चिंतन करणार्‍या अर्थात मोक्षाची इच्छा करणार्‍या व्यक्तीची  ब्रम्ह ईच्छा तू आहेस. भक्तांची चिंता तूच दूर करतेस. भवसागर पार करणारी नौका तूच आहेस. विष्णूच्या अंतकरणातील व शरीरातील दारिद्रय दु:खहारिणी परंतु जनकल्याणार्थ तू आता प्रसंन्न हो. दारिद्रय, दु:ख व भय यांचा नाश कर. तुझ्याशिवाय यासाठी कोणी समर्थ नाही. सर्वांवर उपकार करणारी तू सदैव दयाळू असतेस.
दारिद्रय दु:खभयहारिणी  का त्वदन्या !
सर्वोपकारणाय सदार्द्रचित्त !!
असत् प्रवृत्तीच्या राक्षसांना तू युध्दात मारलेस त्यामुळे त्यांना सुध्दा स्वर्गवास मिळाला म्हणजे युध्दात पराजित होणार्‍या शञू विषयी सुध्दा तुझी चांगली बुध्दी असते. चित्तात कृपा व समरांगणात  निष्ठुरता हे दोन्ही गुण
चित्ते कृपा समनिष्ठुरताच दृष्टा !
त्वय्येव देवि  वरदे भुवनञयेपि !!
शुलेन पाहि ना देवि , पाहि  खड्गेनच अंबिके !
घंटास्वनेन  ना पाहि  चापज्या नि:स्वनेनच !!

'हे देवी शूल, तलवार घेऊन रक्षण कर. घंटानादाने व धनुष्याच्या टणत्काराने आमचे रक्षण कर. हे चंडिके तुझ्या हातातील भाल्याने चोहो बाजीनी आमचे रक्षण कर. हे अंबिके! तलवार, शुल, गदा आदी जी शस्ञे तुझ्या हातात असतील त्या सहाय्याने  आम्हाला रक्षण दे...... या प्रमाणे देवांनी स्तुती केल्यावर देवी प्रसंन्न झाली व वर मागा असे म्हणाली. तेव्हा देवांनी विनविले,' हे माहेश्र्वरी आम्ही तुझे स्मरण केले किंवा न केले तरी तु आमच्या मोठ्या विपत्ती अगर संकटे नाहीशी कर. तुझे नित्यस्तवन  करण्यास समृध्दि दे... तथास्तु! असे म्हणून देवी गुप्त झाली, आणि शुंभ - निशुंभ दैत्यांना मारण्यासाठी पुन्हा प्रगटली.
सप्तशृंग गडावर आल्यावर उजवीकडे देवीच्या मंदिराकडे  जाण्याचे प्रवेशव्दार आहे. येथून ५४८ पायर्‍या वर गेल्यावर  डोंगराच्या कपारीत ८ फुट उंचीची शेंदुर चर्चित रक्तवर्णीय अशा महामाया श्री सप्तशृंग आईचे भक्तांना दर्शन घडते. जगदंबेचे दर्शन झाल्या बरोबर मन प्रसन्न होते, भक्तांचा थकवा नाहीसा होतो. श्री भगवतीला १८ हात असून तिला अष्टादश देवी असेही म्हणतात. प्रत्येक हातामध्ये तीन आयुध धारण केलेली आहेत. श्री भगवतीची मूर्ती ८ फुट उंचीची असल्याने देवीला ११ वार साडी व चोळीला ३ वार खण लागतात. डोक्यावर मुकूट कानात कर्णफुले, नाकात नथ, गळ्यात मंगळसुञ, पुतळ्यांचे गाठले. कमरेला कमरपट्टा, पायात तोडे असे अलंकार दररोज अंगावर घालण्यात येतात. श्री भगवतीची ञिकाल पुजा करण्यात येते. पहाटेची काकड आरती ५.३० वाजता त्यानंतर ७ ते ९ पंचामृत महापुजा व आरती, महानैवेद्य आरती दुपारी १२ वाजता, सांज आरती सायं. ७.०० वा.
महिषासुराला देवीने ठार मारल्यानंतर, इंद्रादी देवगणांनी या देविचे स्तवन केले, हे देवी, तू संपूर्ण विश्र्वाचे पालन करणारी आहेस. तुझ्या  अचिंत्यरूपाचे वर्णन करणे केवळ अशक्य आहे. असुरांचा नाश करणार्‍या पराक्रमांचे आणि त्याचबरोबर झालेल्या संग्रामात तू केलेल्या पराक्रमाचे वर्णन करण्यास आमची बुध्दि असमर्थ आहे. हे देवी, अखिल विश्वाची पिडा तुच निवारा करतेस, हे आज आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे. सर्व शास्त्रांचे सार अशी जी मेधा शक्ती ती तूच आहेस. मधु कैटभ दैत्याचा जो शत्रु भगवान विष्णु, त्याच्या हृदयात तुझे निवासस्थान आहे. चंद्रशेखर शंकराकडून सन्मानित झालेली गौरी, ती तूच होय  तुझे मुख मंद हास्याने शोभणारे व पूर्ण चंद्राचे अनुकरण करणारे असुन ते सुवर्ण कांतिमय आहे. हे देवी, हेच तुझे अनुपम सौंदर्य पाहून महिषासुराला मोह झाला, क्रोध आला  आणि तुझ्यावर चालून आला. शत्रू अंगावर येतांना पाहून तुझे सुवर्णकांन्तीमय मूखकमल, उदयकाळी लाल असणार्‍या चंद्रबिंबा प्रमाणे संतप्त झाले, भुवया क्रोधाने  विस्फारीत झाल्या आणि आक्राळ विक्राळ  स्वरूपात तुझे मुखकमळ, महिषासुराला त्रस्त करीत राहिले. त्या तुझ्या  महाभयंकर उग्र स्वरूपामुळे महिषासुर आणि त्याची प्रचंड सेना, एका क्षणात नष्ट पावली. हे महादेवी दुर्गे, आमचे दुःख, दारिद्र्य व भय यांचे हरण तुझ्याशिवाय कोण करील. त्या तुझ्या शस्त्राने शत्रूचा नाश झाला म्हणजे त्यालाही सदगति मिळते व जीवन मुक्त होते. देवी ही तुझी कृपादृष्टी ! अशा तुझ्या या अलौकिक पराक्रमानेच आम्हाला धीर येतो, अंगात बळाचा संचार होतो आणि शत्रूवर घणघाव घालता येतो, हे माते, तुझ्या ह्दयसंपुटात कृपा आणि निष्ठुरता एकत्रच वास करीत आहेत, हे आम्ही पाहतो. हे आदिशक्ते, आदिमाये, अंबिके, तुझ्या  खड्गाने आमचे रक्षण कर, तुझ्या त्रिशुळाने आमचे रक्षण कर, रक्षण कर. ( सप्तशती, अध्याय ४ था)
महिषासुर वधानंतर देवीने महादैत्य शंभू यांचा वध केल्यावर इंद्रादि देवांनी  देवीची स्तुती केली. जगन्माता, विश्र्वेश्र्वरी, सर्व जगाचे तू रक्षण करणारी आहेस. हे दुर्गादेवी, सर्व भयांपासून आमचे निवारण कर. हे भद्रकाली, सर्व असुरांचा संहार करणारा आणि अग्निज्वाले प्रमाणे  भयानक दिसणारा तुझा त्रिशुळ आमचे सदैव रक्षण करो. ज्या घंटेच्या भयंकर आवाजामुळे, अखिल विश्वाचा थरकाप होतो आणि दैत्यांचे तेज नष्ट पावते, ती तुझी घंटा आमचे रक्षण करो. देवी चंडिके, तुझ्या हाती सुशोभित खड्ग आहे आणि ते असुरांच्या रक्ताने माखलेले असल्याने आमचे रक्षण करण्यास समर्थ आहे. हे आदिशक्ती, तु प्रसंन्न झालीस म्हणजे आमचे सर्व रोग नष्ट होतील. तुला जे कोणी शरण येतील त्यांना विपत्ती कधी येणारच नाही, असा आमचा विश्वास आहे. देवी अंबिके, आपल्या अचिंत्य स्वरूपाचा नाना स्वरूपाचा तू आविष्कार करून देशातील धर्मद्रोह्यांचा संहार करीत आहेस. जेथे जेथे दृष्ट बुध्दिचे दैत्य, महाभयंकर विषारी सर्प, लुटारूंची सेना, अथवा दावानल आहेत, तेथे तेथे तू प्रकट होऊन भक्तांचे रक्षण करतेस. देवी, खरोखरच सर्व विश्र्वाचे पालन करून तू विश्वश्वरी हे नाव सार्थ केले आहेस. भगवान विश्र्वनाथांनाही तू वंदनिय आहेस. हे रनचंडिके, माते, आज ज्याप्रमाणे तू दैत्यसंहार करून आमचे रक्षण केलेस, तसेच यापुढेही सदैव करीत रहावे. सर्व जगातील पाप व पापवासना तू नष्ट कर. तसेच उत्पाद व रोगराई यांच्यापासून रक्षण कर. हे देवी, तुझ्या मस्तकावर किरीट आहे. हातामध्ये महावज्र आहे. तुझ्या सहस्त्रनेत्रातून तेच पसरत आहे, वृत्रासुराचा नाश करणारी देवता तूच होय. संकटसमयी तू भयंकर रूप धारण करून, विकट गर्जना करून, दैत्याच्या महासेनेचाही नाश करतेस. तुझ्या दाढा विक्राळ आहेत. दैत्यांच्या मुंडक्यांची माळ सदैव गळ्यात असणे तुला आवडते. अशी उग्रस्वरूपा चामुंडा नारायणी, तुला आमचा नमस्कार असो. (सप्तशती, अध्याय १० वा)
वैदिकयुगातच ईश्र्वराच्या परम तत्वाची मातृ रूपाने उपासना करण्याची पध्दत प्रचलित झालेली होती. ॠग्वेदात मातृ ब्रह्माचा स्पष्ट परिचय करून दिला आहे. त्याकाळी उपासनेत असलेल्या अनेक देवतांवरून यांची स्पष्ट कल्पना येते. ॠग्वेदा मधील देवीसूतांत आद्यशक्ती देवी भगवतीचे स्वरूप आणि माहात्म्य यांचे वर्णन आहे. सूतात देवी स्वमूखाने सांगते, की ब्राम्ह स्वरूपात भूतलावावर मीच वावरत आहे. रूद्र, वसू आणि आदित्य व इतर विश्र्व देवांच्या स्वरूपात माझाच संचार आहे मित्र, वरूण, इंद्र, अग्नी, अश्र्विनीकुमार यांना मीच धारण करते. मीच जगत्कल्याणासाठी दैत्यांचा आणि आसुर वृत्तीचा नाश करते. माझ्या निस्सीम भक्तांना मनोवांच्छित भोग व मोक्ष मी उपलब्ध करून देते. प्राणी मात्रांचा अभुदय व विश्व कल्याण हे सर्व माझ्याच कृपेवर अवलंबून आहे.

यं कामये तं तमुग्नं कृणोमि तं ब्रह्माणं तमृषिं तं सुमेधाम् ! ( ॠग्वेद १०१२५-१ )
जे जे भक्त मला आवडतात, त्यांना प्रत्यक्ष ब्रह्मा, प्रज्ञावान ॠषी बनविते.
कृष्ण- यजुर्वेदांतर्गत तैत्तरीय अरण्यकामध्ये जहज्जननीचे स्वरूप वर्णन केले आहे.
तामग्नि- वर्मा तपसा ज्वलंतीम् ! वैरोचनी कर्मफलेषु जुष्टाम् !!( अरण्यक १०-१ )

जिचा वर्ण अग्निसमान आहे, तपःसामर्थ्याने दिव्य व दाहक अशा तेजाने तळपत आहे, जी स्वयंमप्रकाशमान आहे, ऐहिक वा पारलौकिक प्राप्तीसाठी साधक जिची उपासना करतात, जी संसार सागरातून परतीराला नेण्यास समर्थ आहे, जी अखिल प्राणिमात्रांचे रक्षण करण्यास समर्थ आहे, अशा त्या आदिशक्तिला माझा नमस्कार असो.

महाभाजवतांतर्गत भगवती- गीतेत परमेश्र्वरी तत्वांचे विवरण आहे. सुजामि ब्रह्मरूपेण जगजेतचराचरम् ! संहारामि.

देवी हिमालयाला सांगते मी ब्रह्मरूपात सर्व जगत् - सृष्टी उत्पन्न करते आणि माझ्या इच्छेप्रमाणे वर्तन करणार्‍या महारूद्राकडून मी शेवटी विश्र्वाचा संहार करते. याप्रमाणे आदिशक्तीचे कितीही वर्णन केले, तरी ते अपुरेच पडणार. आजवर अनेक ग्रंथकारानी या  आदिशक्तीच्या संबंधी भरपूर गुणसंकीर्तन केलेले आहे. सारांश, वरील वर्णन जरी त्रोटक भासले तरी त्या मूळ आदिशक्तीबद्दल यथार्थ ज्ञान होण्यास ते पुरेसे होईल असे वाटते.

At. Post. Saptashrung Gad, Kalwan, Dist. Nashik, Maharashtra 423501

contact us