ऐतिहासिक माहिती

सप्तशृंग निवासिनी भगवती ही ज्ञानदेवांची कुलस्वामिनी होती. त्यांच्या कुळात तिची उपासना कुलदेवीच्या स्वरूपात पिढ्यान पिढ्या चालत आलेली होती. परंतु ज्ञानदेवांनी कुलसंकल्पनेचा विस्तार विश्र्वाला व्यापून ठरण्या इतका केल्यामुळे त्यांची कुलस्वामिनीही विश्र्वव्यापिनी आणि विश्र्वमोहिनी जगदंबा बनली. ज्ञानदेवांनी आपल्या घराला दगडविटाच्या चार भिंतीत सिमित न करता ज्याप्रमाणे हे विश्र्वची माझे घर जसा पैसाचा प्रसाद निवासासाठी निवडला, त्याप्रमाणेच त्यांनी आपले कुलही रक्तमांसाच्या नाते संबंधापुरते मर्यादित न करता सार्‍या भूतमाञाशी जिव्हाळ्याची जवळीक केली. कुलसंकल्पनेच्या लौकिक धारणा उराशी बाळगणार्‍या समकालीन समाजाने जरी त्यांना अकुलीत ठरविले तरी त्यांनी अकुल शिवाशीच एकरूपता प्राप्त केली असल्यामुळे त्यांची  कुलदेवी ही अभिन्नतेनेच त्यांच्या ठायी नांदत राहिली.

कुल आणि अकुल या कौलमतांच्या मध्यकालीन शाकतांञिक  संप्रदायाच्या पारिभाषिक संज्ञा आहेत. कुल म्हणजे शक्ती आणि अकुल म्हणजे शिव. 'कु' ही पृथ्वीवाचक संज्ञा आहे. त्या संज्ञेला ' ल ' हा स्वार्थक प्रत्यय लागून ' कूल ' शब्द बनला आहे. या संप्रदायात कुल आणि अकुल यांचे सामस्ये हे ईप्सित असते आणि ते वामाचाराने साध्ये केले जाते. हा संप्रदाय मत्स्येंद्रनाथांनी कामरूपात अर्धञ्यंबकमठिका नामक केंद्रात प्रवर्तिक केला होता आणि ही अर्धञ्यंबकमठिका ज्या ञ्यंबकमठिकेची शाखा म्हणून स्थापण झाली होती ती महाराष्ट्रात ञ्यंबकक्षेञात गाजत होती. ज्ञानदेवापर्यंत वाहत आलेली परमबोधाची गौतमी गंगा ही ञ्यंबक क्षेञातील ब्रम्हगिरीवरच उगम पावलेली होती. हे सर्वांना माहीतच आहे.

कौलमताची गंगोञी आणि ज्ञानदेवांना लाभलेल्या परमबोधाची गंगोञी एकच असल्यामुळे ज्ञानदेवांवर कुल-अकुल सामरस्याच्या तत्वत्ज्ञानाचे संस्कार घडणे स्वाभाविकच होते.  ज्ञानदेवांच्या कुलस्वामिनी ज्या सप्तशृंग गडावर विराजमान झालेली आहे, त्यांच्या परिसरातच भूदेवीचे लोकधर्मिय उपासना संप्रदायातून कौलमत उतक्रांत झालेले असल्यामुळे तर अशा संस्कारांची शक्यता नाकारता येत नाही. ज्ञानदेवांनी ते संस्कार निश्चित स्विकारले. परंतु केवळ तत्वज्ञानाच्या पातळीवर, आचारांच्या पातळीवर मात्र त्यांनी कौलमताला कटाक्षाने दूर ठेवल. कौलमत  हे तत्वज्ञानाच्या बाबतीत कैवलव्दैती होते, त्यामुळेच त्यातील कुल-अकुलाचे समरसीकरण हे ज्ञानदेवांच्या भावविचारविश्वात शिवशक्ती समावेशाचा अद्वयानंद होऊन राहीले.

अकुल आणि कुलातील ज्ञानदेवांचा हा आगळा कुलाचार पाहता त्यांनी  आपल्या पामानुभूतिच्या वेलीवर फुललेल्या फुलांनी कुलस्वामिनीची अपूर्व अर्चना केली यात कुठलाही संशय उरत नाही. डॉ. रा. ची. ढेरे यांच्या संशोधनातील विवेचनाचा वरीलप्रकारे तपशीलाने विचार केला असता लेखाच्या आरंभी म्हटल्याप्रमाणे सप्तशृंग निवासिनी भगवती ही ज्ञानदेवांची कुलस्वामिनी असल्याचे स्पष्ट होते तसेच कुलाचार या संकल्पणनेतील उदात्तत्ता ध्यानात घेता त्याची व्यापकता देखील सहजतेने नजरेत भरते.

डॉ. अरविंद नेरकर
( संत साहित्य अभ्यासक, पुणे. )

...श्री  संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी तर्फे विश्वस्त मंडळी दरवर्षी सप्तशृंगी मातेला साडी, खण, नारळाची ओटी आणतात. या पुजा विधिच्या माध्यमातून कुलस्वामिनीचं देण देण्या करतांना संत ज्ञानेश्वर उपस्थित असल्याचा अनुभव येतो. ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून अखंडित सुरू आहे. श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट तर्फे संत ज्ञानेश्वरांच्या समाधी मुखवट्या करीता पैठणी किंवा शालू पाठविण्याचं ठरविण्यात आले आहे. ज्ञानेश्वरांच्या समाधीचा वज्रलेप झाल्यानंतर मुखवट्या भोवती विश्वस्त संस्थेने पाठविलेली पैठणी नेसविण्यात आली. ही पैठणी आई सप्तशृंगीला स्पर्श करून नेसवण्यात आली होती. ज्याप्रकारे पुत्र ज्ञानेश्वर  कुलस्वामिनी माते करीता सुहासिनी वाण घेऊन येतात. त्याप्रकारे आईही या पैठणीच्या माध्यमातून पुत्र ज्ञानेश्वरांच्या भेटीला जावी या उद्देशाने सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टने ही परंपरा सुरू केली आहे.

...मुळचे नाशिकचे परंतु सध्या पुण्यात पर्वतीच्या पायथ्याशी वास्तव्यास असलेले नाथयोगी श्री. ज्ञाननाथ रानडे आणि त्याचे शिष्य गेल्या एक तपापासून नाथ कुलदेवतेच्या सेवेत आहेत. श्री. ज्ञाननाथजी हे ज्ञानेश्वर माऊलींच्या गुरू शिष्य परंपरेतील थेट तेरावे दिक्षित, परंपरेप्रमाणे त्यांची दिक्षा झाली. श्री क्षेञ त्र्यंबकेश्वर येथील अनुपानशुलेवर त्यांची उपासना झाली. सप्तशृंग गडावर आई भगवती आणि नाथपंथातील चौरंगीनाथांचा साक्षात्कार त्यांना सप्तशृंग गडावर घडला. त्यांचा हा देवी अनूभव पूढील मुलाखतीतुन मांडण्याचा एक प्रयत्न.

आपण म्हणतात की सप्तशृंग देवी रानडे  कुटूंबाची कुलस्वामिनी नसली तरी आपली कुलस्वामिनी आहे हे कसं काय? मी बापू नारायण रानडे, सप्तशृंग देवी ही जरी रानडे  कुटूंबाची  कुलस्वामिनी नसली तरी, ती माझी मात्र  कुलस्वामिनी आहे. कारण मी एक नाथपंथीय दिक्षांकित असून नाथपंथाची कुलस्वामिनी ही अर्थातच माझी कुलस्वामिनीच !

महाराज, ही सप्तशृंग निवासिनी देवी नाथ पंथाची कुलस्वामिनी मानली जाते. तर त्या बद्दलचे दाखले पुराणात आढळतात का? अहो ही देवी नाथ पंथाची आद्य पुजनीय, वंदनीय अशी देवता आहे. याला आपल्याकडील अध्यात्मिक वाड:मयात अनेक पुरावे दाखले आहेत. देवी भागवत, मार्कण्डेय पुराण या ग्रंथात देवी अवतार कार्याच्या कथा आलेल्या आहेत. नाथ पंथाचे आद्य प्रवर्तक मच्छिंद्रनाथ यांनी या गडावर वास्तव्य केलं, शक्ती उपासणा केली. इथेच जनकल्याणार्थ शाबरी विद्येचा अभ्यास करून अनेक देवतांचा कृपाशिर्वाद मिळवून ती विद्या जनहितार्थ तयार केली. असा श्री. नवनाथ भक्तीसार ग्रंथात दाखला आहे. तर श्री. ज्ञानेश्वरी या ग्रंथात सर्वश्रेष्ठ ज्ञानदेवांनी नमूद केलेली ओवी.

तो मच्छिंद्र सप्तशृंगी ! भग्नावयाचा चौरंगी !
भेटला की तो सर्वांगीन ! संपूर्ण झाला !
(ज्ञानेश्वरी १६-१७-५३)
या ओळी सप्तशृंग देवीचा महिमा सांगतात. या देवीच्या आशेने अन इथे साध्य केलेल्या शक्तीच्या प्रवाहानेच गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ या गुरू शिष्याच्या जोडीने तो हातपाय तोडलेला राजपुत्र देह इथे आणला. त्याला  आपल्या शक्ती सामर्थ्याने पूर्ववत केले. नाथपंथीय दिक्षा दिली अन् चौरंगिनाथ म्हणून त्याचा नाथ पंथात समावेश केला ही कथा सर्वश्रुता आहेच. तसेच हे चौरंगीनाथ अजुनही सुक्ष्मरूपाने या गडावर वास करीत आहेत. काही वेळा त्यांचे इथे दर्शनही होते.

काय !........ दर्शन ..... महाराज तसा दर्शन लाभ हा आपल्याला घडलेला असेलच ! नाही का?
अतिजिज्ञासू प्रश्न वा! तुम्हीतर माझ्या स्मृतिचा एक कप्पाच उलगडायला लावणार की काय हो?

कृपा असावी महाराज. पण थोरांच्या अनुभूतिच्या श्रवणाने सामान्य जीवांची श्रध्दा आणखीन दृढ होतं नाही का? अच्छा बहुत अच्छा! एकंदरीत आज तुमच्या निमित्ताने आदिमायेच्या त्या आठवणी जागविण्याचा विचार आहेतर असो! त्याचं काय झालं माझे गुरू परमपुज्य बाबा हरिनाथजी यांचे कृपेने मला त्र्यंबकेश्वरी जेव्हा नाथपंथाशी शिव-शक्ती उपासना मार्गाशी जोडला गेलो. ही सप्तशृंग माऊली पर्यायाने माता झाली आणि त्या मातेने खरोखरच माझा इथे या पर्वतावर सांभाळ केला. सदगुरू बाबा हरिनाथजी यांनी मला सप्तशृंगी गडावर जाऊन तू ४० दिवस उपासना कर, अशी आज्ञा दिली. ती आज्ञा, सूचना, अटी शिरसावंद्य मानून मी पुण्यातून बाहेर पडलो. प्रथम आळंदी जाऊन ज्ञानेश्वरांचे दर्शन घेतले. जीवनाच्या नव्या वाटेवर ज्ञानेश्वर माऊलीचे आशीर्वाद घेतले. जन्मदात्रीच्या पायावर मस्तक ठेवले. प्रापंचिक वस्त्रे काढून मातेच्या हाती दिली. गुरू आज्ञे प्रमाणे भगवी कफनी धारण केली. गळ्यात शृंगी शैली धारण केली. आणि गुरू माऊलींच्या आज्ञे प्रमाणे सप्तशृंग गडावर अनुष्ठानाला जाण्यासाठी पायी प्रस्थान केले. कारण गुरू आज्ञाही तशीच होती. आपणहून काही मागायचे नाही, कोणी देऊ केले तर नाही म्हणायचे नाही, हा गुरू माऊलींचा सांगावा होता. तर गुरू जन्मदात्री या दोन माऊलींच्या आशीर्वादाने त्या जगत माऊलीकडे निष्ठेने जाणार्‍या माझ्या सारख्या बालकाचा, तिच सर्वत्र सांभाळ करेल, रक्षण करेल, काळजी घेईल हा मनातील विश्वास होता. मोशी फाट्यापर्यंत जाऊन जरा रस्त्याच्या कडेला थांबलो तर तिथे एक ट्रक उभा होता. ड्रायव्हर चाक बदलत होता. चाक बदलून झाले आणि त्या ट्रक ड्रायव्हरचे माझ्याकडे लक्ष गेल. माझ्याजवळ येत त्यांनी विचारले, क्यों बेटा कहा जाना है? मला गुरू आज्ञे प्रमाणेच सप्तशृंग गडावर जायचे आहे उत्तर दिले. इतना दूर कैसे जाओगे बेटा? एक प्रश्न पैदल .....मी म्हणालो. अरे बेटा लेकिन पैदल ही क्यों? बाबा माझ्याकडे पैसा अडका काही नाही. या माझ्या कफणिला आत बाहेर खिसा नाही. पण जायच खरं मी म्हणालो. आणि दुसर्‍या क्षणी ती सहृदयी ड्रायव्हर व्यक्ती म्हणाली, चलो हम तुम्हे नाशिक पहुंचा देते है ! उससे आगे देवळाली जाना है ! चलो !  कोणाकडे काही मागायचे नाही पण न मागता कोणी देऊ केलेतर ते नाकारायचे नाही. हा गुरूदेवांचा सल्ला आठवला आणि आगे मागे गोरख जागे, असे म्हणून प्रवास चालू झाला. त्या ट्रक ड्रायव्हरने मला नाशिकरोडला सोडले. माझा नाशिकरोड पर्यंतचा प्रवास आणि दुपारचे भोजन त्याच देव माणसामूळे झाले. भगवंत आपल्या भक्तांचा योगक्षमे कसा चालवतात, माय आपल्या लेकराची काळजी कशी घेते, याच्या गाढ अनुभवाने जीव सुखावला. पण गुरू स्मरण करून  गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ यांचे नाव घेत पुढे प्रवास चालू केला. मात्र थोड्या वेळातच एक गाडी येऊन शेजारी थांबली. गाडीत एकच मुंबईचे गुजराती कुटूंब होते. त्यांना सप्तशृंग गडावर जायचे होते. त्यांनी रस्ता विचारला. मी हाताने खूण केली. गाडी पुढे गेली आणि थोड्याच अंतरावर थांबली. त्यांनी एकवार माझ्या बालमूर्तीकडे, अंगावरच्या कफनीकडे, गळ्यातल्या शृंगी शैलीकडे नजर टाकली अन् त्या गृहस्थांनी प्रश्न केला, आपको कहा जाना है? मला सप्तशृंग गडावर जायचे आहे. असे म्हणताच त्यांनी मोठ्या आस्थेने गाडीचा दरवाजा उघडला अन् मला गाडीत घेतले. थोड्याच वेळात आम्ही नांदूरी गावापाशी येऊन पोहोचलो. पुढील रस्ता ५.३० किलो मीटरचा होता. त्यावेळी हा सगळा परिसर म्हणजे अरण्यच ! पायी चढून वरती जाण्याचा हा एकच मार्ग. पायथ्याला काही कष्ठकरी शेतकरी यांची घरे, गायी, म्हशींचे गोठे दूध आणि खवा हीच अर्थार्जनाची साधन डोंगरावर उंच कपारीत देवीचे देऊळ, एका भव्य कपारितील ती अष्टदश हाताची शिर झुकवून उभी असणारी आदिशक्ती मातेची भव्य मूर्ती माथ्यावरच्या डोंगरावरची ध्वजा समोरचा मार्कण्डेय पर्वत, भोवती दाट वृक्ष झाडी असा सारा एकूण परिसर..... मी माझ्या सदगुरूच्या आज्ञे प्रमाणे दुसर्‍या दिवशी सकाळी सप्तशृंग देवीचे दर्शन घेतले. गुरू आज्ञा सांगितली आई आता माझे हे ४० दिवसाचे अनुष्ठान तुच पुर्ण करून घे, अशी प्रर्थना केली. ओंजळीत आलेल्या प्रसादावरच ती रात्र काढली आणि दुसर्‍या  दिवसापासून आदिमायेच्या उजव्या बाजूला असणार्‍या शिवतीर्था जवळच्या एका छोट्या शिव मंदिरात मुक्काम करून तिथेच एका झाडाखाली, धुनी चेतन करून माझी उपासना सुरू केली. मी तिथे अनुष्ठानाला बसलेला पाहुन कोण्या एका गवळ्याला काय प्रेरणा झाली कोणास ठाऊक तो मला एका पातेल्यातून दूध आणुन देऊ लागला. कधी एखादे फळ, कडुलिंबाचा रस, दुध यावरच माझी उपासणा चालू झाली. आपण केवळ आपल्या गुरूंनी सांगितलेली उपासना, ध्यान, जपतप, अनुष्ठान हे एक एक दिवसाने वाढत गेले. एके दिवशी माझी पहाटेची उपासना चालू असतानाच अचानकपणे अंगात आखूड बंडी, खाली धोतर, डोक्याला मुंडासे, हातात काठी, अशा एका व्यक्तीच दर्शन झालं. माझ्याजवळ त्यांनी चहाची मागणी केली.

बेटा चाय पिलाओ...
बाबा, अहो मी हा असा माझ्याकडे चहा कुठून असणार ? दूध आहे ते देऊ का ?
नही बेटा हम तो चाय पिनाही चाहते है.
मी म्हणालो, पण बाबा ?....
तु ऐसा कर, तू चाय बनाने की तैयारी तो कर
मी पातेल्यातील दूध एका करवंटीत काढले. थोड्या दूधात पाणी घालून ते धुणीवर उकळायला ठेवले. तेवढ्यात त्या व्यक्तीने खिशातून एक साखरेचा खडा आणि काही चहाची भुकटी काढली व पातेल्यात टाकली. थोड्या वेळातच तो चहा दोन करवंट्यात ओतून आम्ही दोघांनी पिला. चहा झाल्यावर ती व्यक्ती म्हणाली, चलो तुम्हारा काम तो हो गया. मै चलता हु मी नमस्काराला पुढे झालो तर काय ! त्या व्यक्तीचे पाय जमिनीवर नव्हतेच.

बाबा, आपण कोण? मला हे दर्शन हा प्रसाद कोणाचा? असं मी विचारणार, तोच ते म्हणाले, ओळख मी कोण? कळले अरे माझ्या शिवाय इथे दुसरं कोण असणार? आवाज आणि आकृती पाहता पाहता ती दूर विरून गेली. त्याच वेळी अचानक हरिनाथ बाबांकडून ऐकलेली, नवनाथ ग्रंथात वाचलेली एक गोष्ट आठवली. चौरंगीनाथ हे अजूनही वायुतत्वावर इथं येतात जातात. त्यांचं या गडावर दर्शन होतं. हे दर्शन चौरंगीनाथांचच होत. दर्शन झाल्याने मन सुखावले डोळे मिटले गेले काही काळ असाच गेला आणि अचानक डोळ्यांपुढे एक तेजोवलय चमकलं व त्यात काही संदेश येऊ लागला. भाषा संस्कृत होती. अन पहाटे आलेला तो संदेश, ती आज्ञा अशी होती की तुझे अनुष्ठान पूर्ण झाले आहे. तू उद्या सकाळी स्नानाला उतरशील तेव्हा माझे नाव घेऊन डुबकी मार जे तुझ्या हाती येईल ते घेऊन जा. तोच माझा प्रसाद आहे. जा ! हा संदेश होता साक्षात भगवतीचा, प्रसाद घे आणि तुझ्या कार्यासाठी तुझ्या कर्मभूमीत परत जा क्षणभर पुढे काहीच बोलवेना सर्व स्तब्ध झाले. मग सुखद स्मृतीतून बाहेर येत ज्ञाननाथजी म्हणाले, अहो दुसर्‍या दिवशी त्या शिवतीर्थात मला एक धातूचं कडं मिळाल. अजून ही तो प्रसाद जपलेला आहे. त्यावर नाग, गणेश, देवी आणि चौसष्ट योगिणी यांच्या खुना आहेत.

...सप्तशृंगी  गडाला तपोभूमी म्हणून ओळखलं जात म्हणून कि काय मोठ मोठ्या तपस्विंचे पाय सप्तशृंगी गडाला लागलेत. शिर्डीच्या साईनाथांनी तर दास गुणांना भगवतीच्या सेवेसाठी तब्बल पंधरवाडा गडावर येऊन ठेवल्याचे खुद्द दास गुणांनी सांगितले आहे. मार्कण्डेय पर्वतावर मच्छिंद्रनाथांने ७ वेळेस गडाची वारी केल्यानंतर भगवतीने कृपा करून त्यांच्या झोळीत हवे ते दिल्यामूळे शाबरी विद्येचा उगम झाला.  त्यामुळे सप्तशृंगी मातेला विद्या उपासकांची जननी म्हणून ओळखलं जात. त्यामुळेच बरेचसे उपासक गडावर आले. आईच प्रेम त्यांनी त्यांच्या झोळीत सामावून घेतलं आणि लोककल्याणा करीता निघुन गेले. या तपस्वींमधले एक तपस्वी गडावरच थांबले. ते तपस्वी म्हणजे दाजिबा महाराज या दाजिबा महाराजांची संजीवन समाधी सप्तशृंग गडावर आहे. (संजीवन समाधी म्हणजे जिवंतपणी घेतलेली समाधी श्री ज्ञानेश्वरांच्या समाधीलाही संजीवन म्हणून ओळखलं जातं) गडावरील दाजिबा महाराजांची संजिवन समाधी १२५ वर्षा पुर्वीची आहे असं म्हटलं जात. परंतू एकूणच सप्तशृंग गडाबद्दल पुरातन काळातील कोणतही लिखीत साहीत्य नसल्याकारणाने या समाधीबद्दल  फारशी माहिती मिळवू शकलो नाही. या समाधीबद्दल माहिती दिली ती ठाणे तेथील पुज्य श्री संत गजाजन पट्टेकर महाराज यांनी महाराज हयात असतांना नाशिक मधील एका वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत दाजिबा महाराजांच्या समाधीचा जिर्णोध्दार व्हावा अशी अंतरर्यामी तळमळ व्यक्त केली होती. त्याप्रमाणे ट्रस्ट व गडावरील पुरोहित वर्गाच्या सहकार्याने समाधीचा जिर्णोध्दार करण्यात आला. याबद्दल या लेखात आपण पुढे सविस्तर जाऊन माहिती घऊच, पण त्यापूर्वी दाजिबा महाराज कशा प्रकारचे तपस्वी व्यक्ती महत्व होते याबद्दल पट्टेकर महाराजांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीतून कळते, ती माहिती जाणुन घेऊयात जसा शंकराचा नंदी तसा सप्तशृंगी मातेचा दाजिबा असा उल्लेख पट्टेकर महाराज दाजीबा महाराजांचा करतात. यावरून दाजिबा महाराज आणि सप्तशृंग मातेचं नातं कळतं. कोणी म्हणंत की, दाजिबा महाराज हे नाशिकहून गडावर आलेत, तर कोणाचं सांगण आहे की, महाराज त्र्यंबकेश्वर वरून गडावर आलेत. महाराज नक्की कोठून आलेत हे निश्चत माहिती नसले तरी भक्तांच्या नवसाला हमखास पावणारे म्हणून त्यांच्या मातृ भक्तीचे ऐतिहासिक दाखले उपलब्ध आहेत. दाजीबा महाराजांच्या लीला सांगताना पट्टेकर महाराजांनी दत्त अवतारी गजानन महाराजांच उदाहरण दिलं होत. या प्रकारे गजानन महाराजांनी आपल्या लीला करून दाखवल्यावर त्यांना लोकांनी वेडापिसा समजून त्यांच्याशी विस्तवाचा खेळ केला. पण सारेजन त्यांना डोक्यावर घेऊन त्यांचा जय जयकार करत आहेत. नेमकी तसीच अवस्था दाजिबा महाराजांची प्रारंभी तेथील लोकांनी केली होती. ऊन पावसात बसणार्‍या दाजिबांना तेथील लोकांनी वेड म्हणून हिनवले. ते भगवतीच्या नावाने आई म्हणुन ओरडायचे, पण भगवती मात्र ५०० पायर्‍यांवर असायची. तरी देखील मागेल त्या पक्वानांच्या पत्रावळ्या पाठवून या मुलांचा हट्ट आई पुरवायची. आज अधून मधून गडावर या भागातून वाघाचे आगमन होत, त्या ठिकाणी म्हणजे दाजिबांच्या आवती भोवती वाघ येऊन बसत अशी अख्यायिका लोक सांगतात. सध्या कलयुगामध्ये वाघा ऐवजी साप लोकांना मिळतात पण कोण्या भक्ताला त्यांनी दंश केल्याची ओरड ऐकिवात नाही. दाजिबांनी आईच्या आज्ञे वरून नर्मदा प्रदक्षिणा केली. ही प्रदक्षिणा म्हणजे मानवाला अग्निदिव्यातून करावयास लावणारी खडतर तपश्चर्यांच समजली जाते. जंगली श्वापदांशी मुकाबला करण्याची सवय दाजीबा महाराजांना गडावरच झालेली असल्यामुळे ते या दिव्यातून सहजगत्या आईच्या आर्शिवादाने पार पडले व बडोद्याला येऊन धडकले. मुळातच महाराजांची कांती तपस्वी असल्याने आपल्याकडे आलेले दक्षिण देशातील महाराज दैवी असल्याचं बडोद्यातील लोकांनी ओळखलं. महाराजांच्या भोवती दुःखी पिडीतांची रीघ लागली. त्याच बडोद्याचे नवकोट नारायण महिराळ यांच्या पत्नी अर्धांगवायुने बिछाण्यावर खिळलेल्या होत्या. त्यांच्या घरातील नोकरांनी सांगितले, दक्षिण देशातून देविचा भक्त असलेला साधु आला तो लोकांची दुखणी बरी करतो. आपण त्याच्या दर्शनाला चलावे पण महिराळ बाईनी सांगतले की, देवी मला बरे करू शकणार नाही! तरी देखील नोकरांनी त्यांना दाजिबा महाराजांन कडे आग्रहाने उचलून नेलेच महिराळबाई दाजिबा महाराजांकडे आल्यावर ते म्हणाले तुमचे दुखणे फार मोठे आहे. तरी देखिल तुम्हाला माझी आई चार दिवसात बरी करिल. त्यावर महिराळबाई महाराजांना म्हणाल्या, की तुमची आई कोठे आहे? महाराजांनी सांगितले की, दक्षिण देशात नाशिक जिल्ह्यात सप्तशृंग गडावर आहे. म्हणून तिचे कुंकू महिराळबाईंना लावले. चार दिवसांनी बरे वाटले की आम्ही सगळे गडावर येऊ असे तिचे पती गोपाळराव म्हणाले. चार दिवसांनी महिराळबाई ठणठणित बर्‍या झाल्या आई सप्तशृंगीच्या आशिर्वादाची आणि दाजिबा महाराजांच्या चमत्काराची त्यांना प्रचिती आली. आपल्या पत्नीला बरे वाटल्याचे पाहुन गोपाळरावांना आनंद झाला आणि म्हटल्या प्रमाणे ते सहकुटूंब गडावर दर्शनासाठी दाखल झाले. महाराजांच्या सांगण्यावरून गोपाळराव महिराळकरांनी गडावर धर्मशाळा बांधली. चांदीची भांडी देवीला दिली. इतकेच नव्हे तर धर्मशाळा बांधायला हत्तीवरून लाकडे आणली अशी कथा सांगितली जाते. दाजीबा महाराजांनी दिलेल्या चांदीच्या पादुका आजही गोपाळराव महिराळ यांच्याकडे आहेत. सहाजिकच महाराष्ट्र, गुजरातभर ही वार्ता पसरली आणि गडावर दाजीबा महाराजांच्या दर्शनासाठी रीघ सुरू झाली. त्याच दिवशी दाजी महाराज समाधीस्त झाले. सप्तशृंगगडावर सुर्यकुंड आणि कालीकुंड जवळ दाजिबा महाराजांच्या समाधीचं दर्शन घडतं. दाजिबा महाराजांच्या समाधीपासून पाचशे पायर्‍यांवर असणारं देविच मंदिर स्पष्ट दिसतं. हे समाधी स्थान पाहिल्यावरच असं वाटत, की या समाधीतून महाराज आजही आपल्या आईशी संवाद साधत असतील. गडावरील या समाधीचा शोध गजानन महाराज पट्टेकरांनी लावला. त्यावेळी या समाधीवर वेल आणि गवत वाढून ती दिसेनाशी झाली होती. या प्रसंगी या समाधीच्या जवळ एक आदिवासी म्हातारा पट्टेकर महाराजांना भेटला. या व्यक्तीने समाधीची नेमकी जागा दाखविली. त्याला नाव गाव न विचारता महाराजांनी प्रथम नम्रपणे नमस्कार केला आणि नंतर विचारले की, आपले नाव काय? यावर त्या व्यक्तीने दाजीबा असे सांगताच एका महान विभुतीच्या दर्शनाचा अत्यानंद पट्टेकर महाराजांना झाला. त्यानंतर गडावरील जेष्ठ पुरोहित मधुकर दीक्षितांना बोलवले व तीन गड्यांना बोलाऊन समाधीची जागा साफ करण्यात आली. आज दिसतोय तसा पादुकांसह चबुतरा वर आला. या समाधीवर मंदिराचं बांधकाम करून श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टने गडावरील पुरोहित वर्गाच्या मदतीने विधीवत जिर्णोध्दार केला. आज हे संजिवन समाधीस्थान भाविकांना दर्शनाकरीता उपलब्ध करून देण्यात आलयं. दाजिबा महाराजांचे समाधीस्थान तेजस्वि असल्याने सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतल्यानंतर या स्थानाचं दर्शन निश्चित घ्यावं.शिवालय तिर्थाजवळ  एक हेमाडपंथी मंदिर आहे. जवळच एक मारूतीचे मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर एक लाकडी खांबाची जागा आहे. येथे पूर्वी मल्लखांब होता आता नाही. मल्लखाबाचे मुळस्थान हेच आहे. मल्लविद्येचे गुरू बाळंभट्ट दादा देवधर यांन मारूती रायाने या विद्देचे धडे दिले व तेथुन मल्लखांब विद्या सुरू झाल्याचे उदाहरणे सापडतात. मल्लविद्येचे गुरु बाळंभट्ट दादा देवधर यांना माकडाच्या रुपात मारुती रायाने या विद्येचे धडे दिले व तेथून मल्लखांब विद्या सुरु झाल्याचे उदाहरणे सापडतात. या विषयाचा संदर्भ व्यायाम कोशातील मल्लखांब या खेळा बद्दलच्या इतिहासात सापडतो.

At. Post. Saptashrung Gad, Kalwan, Dist. Nashik, Maharashtra 423501

contact us