नवरात्र उत्सव




 

...शारदीय नवरात्र उत्सव-
सप्तशृंग गडावर दरवर्षी अश्विन शुध्द म्हणजेच सप्टेंबर / ऑक्टोबर महिन्यात शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो. नऊ दिवस चालणार्‍या नवरात्र उत्सवाची सांगता नवमीच्या हवनाची पुर्णाहुती दुसर्‍या दिवशी दसर्‍याला देऊन होते. या दिवशी देवीच्या यथासांग पुजे बरोबर शस्त्र पुजाही केली जाते. नवरात्रातील सप्तमीस म्हणजेच सातव्या माळीला गडावर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. सप्तमीला आई सप्तशृंगीचं दर्शन घेतल्याने आपल्या सगळ्या चिंता दुर होतात. या भावनेने भाविक गडावर दर्शन घेण्यासाठी येतात. सप्तमीला सप्तशृंगगडावर सप्तशृंगी आईचा वास असतो असेही म्हटलं जातं.




...चैत्र नवरात्र उत्सव-
चैत्रोत्सवास चैत्र शुध्द म्हणजेच मार्च / एप्रिल महिन्यात रामनवमी पासून गडावर चैत्र उत्सव प्रारंभ होतो. हा उत्सव साधारणत: दहा ते बारा दिवस सुरु राहतो. या उत्सवात आईचं माहेर म्हणवल्या जाणार्‍या खांदेशातून लाखो संख्येने भाविक गडावर पायी येतात. अडीचशे किंवा त्याहून जास्त किलो मीटर पायी प्रवास करुन आईच्या दर्शनास येणार्‍या या भाविकांची मिलन सोहळा पाहण्यासारखा असतो. या उत्सवात चावदस म्हणजेच चतुर्सशीच्या (खांदेशातील भाविक चतुर्दशीला चावदस असे म्हणतात) दिवशी खांदेशवासी मोठ्या संख्येने आईचं दर्शन घेतात व दुसर्‍या दिवशी असणार्‍या पैार्णिमेस घराकडे परततात. सप्तशृंगगडावर चैत्र उत्सवास लाखोंच्या संख्येत भाविक दर्शनास येतात.


...पौर्णिमा-
वर्षातील बारा महिन्यांमध्ये प्रत्येक महिन्यात एक पौर्णिमा हि असतेच. या प्रत्येक पौर्णिमेस गडावर गर्दी असते पण खास करुन शारदीय नवरात्रानंतर येणार्‍या कोजागिरी पौर्णिमेस कावड घेऊन येणार्‍या भाविकांची मोठी संख्या बघायला मिळते. मध्यप्रदेश, नंदुरबार, धुळे, नाशिक, मुंबई, तळोदा, उज्जैन येथून आईचे भक्त वेगवेगळ्या नद्यांचं तीर्थ कावडात घेऊन पदयात्रा करत गडावर येतात. या कावडातील तीर्थाचे आईला कोजागिरीस रात्री १२.०० वाजेपर्यंत स्नान घालण्यात येते. हा अभिषेक म्हणजे वेगवेगळ्या नद्यांच्या जलाचा आईच्या पायाशी संगम असतो. या अभिषेकानंतर आई सप्तशृंगीची महापुजा होऊन आरती पार पडते. या सोहळ्याचे साक्षीदार होणं हे मोठ भाग्यचं आहे. या दिवशी गडावर आईच्या दर्शनास मोठ्या संख्येने किन्नरही हजेरी लावतात.




...धनुर्मास उत्सव-
धनुर्मास उत्सव हा सुर्यनारायणाच्या पुजेचा उत्सव वर्षामध्ये डिसेंबर / जानेवारी या काळात साजरा केला जातो. धनुर्मासात सुर्यनारायण दक्षिणायन करतात. आणि रविवार हा सुर्य देवतेचा वार असल्याने त्या दिवशी आई सप्तशृंगीच्या पुजेच्या माध्यमातून सुर्य देवतेची पुजा पार पडते. वर्षामध्ये डिसेंबर व जानेवारी महिन्याच्या प्रत्येक रविवार या दिवशी श्री भगवतीच्या पंचामृत महापुजेला पहाटे ५ वाजताच प्रारंभ होतो. या पुजेची आरती तेव्हाच पार पडते जेव्हा सुर्यनारायणाची किरणं आईच्या चरणावर येता क्षणी मोठ्या जयघोषात आरतीस प्रारंभ होतो. या पुजेत आईला वांग्याचं भरीत, भाकरी व तांदळाच्या खिचडीचा नैवेद्य दाखविला जातो. पुजेनंतर या प्रसादाचे भाविकांमध्ये वाटप केले जाते.




...सप्तशृंगगडावरील शिखरावर ध्वज-
चैञ पौर्णिमा व विजयादशमी या दिवशी आई सप्तशृंगीच्या शिखरावर दरेगावचे गवळी (पाटील) परिवार वंशपरंपरेने ध्वज लावतात. देवीच्या शिखरावर चढण्यासाठी मार्ग नाही. तरी देखील हे अवघड कार्य दरेगांवचे गवळी (पाटील) परिवार वंशपरंपरेने करीत आहेत. गवळी परिवारातील आजोबा रायाजी पाटील यांच्यापासून गडावर ध्वज लावण्याचे ते सांगतात. परंतु ध्वज लावण्याची प्रथा या पूर्वीची  आहे. तब्बल गावातील भाविक सप्तशृंगगडावर पायी चालत येऊन ध्वज लावला जातो असे सांगतात. तो ध्वज प. पू . रेणूकादास महाराज यांचे वंशज व बेटावद गावातील आघार, ठेंगोडा, देवळा, कळवण, नांदुरी या मार्गाने पायी प्रवास करून शेवटी गडावर पोहचत. गडावर आल्यानंतर चैञ शुध्द चतुर्दशीला राञी ध्वज लावला जात असे. सध्या देवस्थानचा कारभार पाहण्यासाठी विश्वस्त संस्थेची स्थापना झाल्यापासुनच सदरचा ध्वज कार्यालयात जमा केला जातो. आजही सप्तशृंगगडावर देवी भक्त प.पू. रेणूकादास महाराज यांची समाधी शिवालय तलावाच्या बाजुला आहे असे सांगतात. त्या ठिकाणी बेटावद परिसरातील देवी भक्तांचा मुक्काम चैञ शुध्द १३ ते चैञ शुध्द पौर्णिमे पर्यंत असतो. हल्ली विश्वस्त संस्थेमार्फत दरेगांवचे गवळी (पाटील) चैञ शुध्द चतुर्दशी व अश्विन शुध्द नवमी असे वर्षातून दोन वेळेस शिखरावर ध्वज लावतात. हा ध्वज ११ मीटर केशरी रंगाच्या कापडाचा बनवण्यात येतो. तसेच ध्वजासाठी १० फुट उंचीची काठी व सुमारे २० ते २५ किलो वजनाचे पूजा साहित्य घेऊन ध्वजाचे मानकरी ध्वज लावतात. आजही रेणुकादास महाराजांचे वंशज बेटावद येथुन १९८१ सालापासून पायी वारी करून ध्वज घेऊन येत असतात. बेटावद प्रमाणेच अनेक भाविक गडावर दर्शनासाठी येतांना लहान मोठे ध्वज घेऊन श्री भगवती मंदिराच्या परिसरात लावतात. त्यामुळे याञा उत्सवात मंदिराच्या परिसरात ध्वजच ध्वज दिसतात. श्री सप्तशृंग निवासिनी देवी चे दर्शन झाल्यानंतर तिची प्रदक्षिणा झाल्याशिवाय याञेची पूर्तता होत नाही असे म्हणतात. श्री भगवतीला प्रदक्षिणा घालण्याचा ३ किलोमीटर लांबीचा पाऊल वाटेचा मार्ग विश्वस्त मंडळाने पक्का केला असून पाठीमागील बाजुस परशुराम बाळाचे दर्शन घडते. प्रदक्षिणा समयी गडाच्या परिसरातील निसर्गरम्य वातावरणाची अनुभूती होते. संकट विमोचनी महिषासुरमर्दीनी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची वर्षभर गर्दी असते. (मा. जिल्हाधिकारी साहेब, नाशिक यांच्या आदेशान्वये प्रदक्षिणा रस्ता बंद आहे.)

At. Post. Saptashrung Gad, Kalwan, Dist. Nashik, Maharashtra 423501

contact us