या गिरीजा नदीच्या तिराजवळ सर्व पर्वतांत श्रेष्ठ असा सप्तशृंग पर्वत आहे. सह्याद्री पर्वताचाच एक भाग असलेल्या यास सात शिखरे आहेत. त्यावर श्री जगदंबेचे स्वयंभू स्थान आहे. हीच भगवती रक्तबीज आणि शुंभ - निशुंभ आदि सर्व दैत्यांसहित सर्व श्रेष्ठ अशा महिषासूर नामक दैत्याचा वध करून या सप्तशृंग पर्वतावर निरामय स्थान पाहून राहू लागली. या देविचे नाव दुर्गा आहे. तिलाच सप्तशृंग देवी म्हणतात. या देवीला अठरा हात असून तिने सिंहावर आरोहन केले आहे. ही देवी भक्तांवर पूर्ण कृपा करणारी आहे. या देवीचे दर्शन करणार्यांच्या अंतकरणात आनंद निर्माण होतो.
शितकडा याला सतीचा कडा असेही म्हणतात. शिवालय तिर्थापासून थोड्याच अंतरावर शितकडा नावाची दरी आहे. ही दरी सुमारे १२०० फुट खोल आहे. हा कडा खूप उंच व सरळ आहे. या कड्याचा वापर पूर्वी बलिदानासाठी होई. गडावर काही संकट येऊ नये म्हणून तेथे पशु बळी देण्याची पध्दत होती. याला भग देणे असे म्हणत. तसेच देवीची कृपा व्हावी म्हणून या कड्यावरून लोटून बळी दिला जाई. या कड्याची एक अख्यायिका आहे. फारफार वर्षापूर्वी एका बाईने देवीला नवस केला होता की, तिला जर मुलगा झाला तर ती मुलासह सप्तशृंगीगड चढून येणार होती व मुलासह दर्शन घेऊन देवीला नमस्कार करून बैलगाडीतून शितकडा उतरणार होती. शितकडा म्हणजे कुठल्याही वस्तूला कड्यावरून खाली टाकले तर त्या वस्तूचे भाताच्या शिताप्रमाणे होणे. देवी बाईच्या इच्छेप्रमाणे नवसाला पावली व बाईला मुलगा झाला. नवस फेडावयाचा आहे असे सांगितले. तिचा नवरा तयार होईना शेवटी त्या बाईचा घरगडी बैलगाडी चालविण्यास तयार झाला. सर्वांना देवीची करूणा भाकली. घरगडी, बैलगाडी, बाई व मुलगा कड्यावरून सुखरूप खाली उतरले. हा भयान नवस देवीने बाईकडून फेडून घेतला. आजही शितकड्यावर गाडीच्या चाकोर्या दिसतात. कड्याच्या वरचे बाजूस वार्याचा झोत फार मोठा असतो. आता सध्या तेथे कड्याचा वरीलभाग कुंपण घालुन सुरक्षित केलेला आहे. हा कडा पविञ समजून लोक त्याचे दर्शन घेतात.
सप्तशृंग परिसर अनेक पवित्र ठिकाणांनी पवित्र झाला आहे. त्यात मार्कंण्डेय ऋषिंचा उल्लेख महत्वाचा ठरतो. सप्तशृंगीचे मुख पुर्वेकडे आहे. तेव्हा समोरील मार्कंण्डेय डोंगर नजरेत भरतो. मार्कंण्डेय भृगृ वंशातील त्रेता युगात झाले. प्रारंभी ते अल्पायुशी होते. परंतु सप्तर्षींचे आशिर्वादाने दिर्घायु झाले. धर्मराज वनवासात असताना मार्कंण्डेय ऋषींनी त्याला अनेक वृतांत कथन केले. कल्पातीच्या वटवृक्षाचे व प्रलयाचे दर्शन मार्कंण्डेय ऋषींना झाले होते. वयाचे साठ वर्ष पूर्ण झाल्यावर दिर्घायुष्य प्राप्तीसाठी जी शांती करतात तिच्यात प्रमुख देवता मार्कंण्डेय हीच असते. याच गडावर मार्कंण्डेय ऋषीं आसनस्थ होऊन देवीला तिच्या पराक्रमाचा कथा ऐकवत व देवी किंचित मान वाकडी करुन ऐकत असे. मार्कंण्डेय ऋषी चिरंजीव होऊन सर्व देवात श्रेष्ठ ठरले.
ब्रम्हदेव म्हणाले, हे नारदा, या मृत्युलोकात सह्याद्री पर्वतापैकी असलेला एक सप्तशृंग पर्वत हा भाग आहे. या पर्वतावर अनेक तीर्थे आहेत. त्यात गिरीजा नामक एक तीर्थ असून सांप्रत त्यास शिवालय तीर्थ म्हणतात. या तीर्थात स्नान केले असता सर्व पातकांचा नाश होतो. या तीर्थात स्नान करून महिषासुरादिकांचा नाश करणार्या षड्गुणैश्र्वर्य संपन्न असलेल्या श्री जगदंबेचे दर्शन घेईल. तिचे पूजन करील त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. याप्रमाणेच या सप्तशृंग पर्वतावर उत्तरभागी असलेली ब्रम्हदेवाच्या पासुन निघालेली स्वर्ग, मृत्यू व पाताळ या तिन्ही लोकांत प्रसिध्द असलेली, सर्व पातकांचे हरण करणारी महापुण्यकारक गिरीजा नामक महानदी आहे.
वरील विवेचनानंतर ब्रम्हदेव म्हणाले, हे नारदा, मार्कंण्डेय ॠषी या महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने चिरंजिव होऊन सर्वजगात श्रेष्ठ झाले. या ॠषीने मार्कंण्डेय पर्वतावर अनेक कोट्यावधी तीर्थे निर्माण केलीत. त्यातील कोटी तिर्थ प्रसिध्द असून लोकांना पविञ करणारे आहे. या तीर्थात स्नान करनारा सर्व पापांपासून मुक्त होईल. या कोटितिर्थात स्नान करून पितृतर्पन करून पिंडदानपूर्वक श्राध्द करील त्याचे पित्र अक्षय तृप्त होऊन मुक्त होतील. सप्तशृंग पर्वताजवळ शिवालय तीर्थ नामे पुण्यकारक सरोवर आहे. त्यात स्नान केल्याने ती अधिभौतिक, आध्यात्मिक, आधिवैदिक या विविध पापांतून मुक्त होतो. या तीर्थात स्नान करून जो कोणी पिंडश्राध्द करील तो पित्रांसहित जगदंब स्वरूपाला प्राप्त होईल. ज्याप्रमाणे भागिरथी, गोदावरी, नर्मदा तीर्थे आहेत त्याप्रमाणे शिवालय तिर्थ असून अखिल अक्षय सौख्य देणारे आहे. या तीर्थात सनक - सनंदादी ब्रम्हॠषींनी नेहमी स्नानादिकने पविञ केलेल्या तीर्थात ब्रम्हदेवासहित विष्णू भगवान शंकर मध्यांन्ही येऊन शिवालय तिर्थावर स्नानसंध्या अर्पण विधी करतात.
पूर्वी सप्तशृंग गडावर १०८ कुंडे असल्याचा उल्लेख आहे. सध्या प्रत्यक्षात १० ते १५ कुंडे दिसतात. बाकीची कुंडे बुजली असावीत. गडावरून पूर्व दिशेकडे गेले की मारूतीचे मंदिर व पुढे दाजिबा महाराजांची समाधी लागते. दाजिबा महाराजांच्या समाधीपासूनच जवळच सूर्यकुंड, कालीकुंड आहेत. हि दोन कुंडे छञसिंग ठोके यांनी बाधली. याच कुंडाच्या पाण्याचा वापर श्री भगवतीच्या दैनंदिन स्नानासाठी केला जातो.
जलगुंफा या नावाने एक तीर्थ खाली कपारीत आहे. ते नैसर्गिक पर्वत पोखरणीत आहे. ती पर्वत पोखरणी देवीच्या पायापासून उगम पावलेली आहे असे म्हणतात. तेथे गडद अंधार असल्यामुळे पाण्याचा किती थांग आहे हे सांगता येणार नाहीत. पोखरणीचे मुख पूर्वेकडे असल्यामुळे सकाळच्या सुर्यकिरणांनी अंधुक उजेड पडतो. तीर्थावरील पाणी बर्फासारखे थंड आहे. तसेच यात तीन डोळ्यांचा मासा असून त्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण होते असे सांगितले जाते. तसेच असेही सांगितले आहे की, याच पर्वतावर एक विचिञ वृक्ष आहे त्याची पाने काश्याच्या स्पर्शाने मृतीकामय होतात. तीच पाने पाच प्रहरपर्यंत अग्निचा स्पर्श केला म्हणजे त्याचे रोप बनते. जलगुंफेतील या तीर्थास मत्स्यातीर्थ असे म्हणतात.
सप्तशृंगगडाच्या दक्षिणेस शिवालय नावाचे एक पुण्यकारक तीर्थ आहे. हेच ते गिरीजा तिर्थ व शिवतीर्थ होय. पूर्वी त्याचे बांधकाम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केले. परंतु त्याची पडझड झाल्याने विश्वस्त संस्थेने त्याचा जिर्णोध्दार केला असून तेथे स्नाना बरोबरच वस्ञांतर गृहाची व्यवस्था केलेली आहे. या कुंडात स्नान केल्यास विविध पापांपासून मुक्ती मिळते अशी भाविकांची श्रध्दा आहे. या तीर्थात सर्व देवांनी स्नान केल्याची अख्यायिका आहे. या तिर्थात स्नान करून जो कोणी पिंडश्राध्द करीन तो पिञासहीत जगदंब स्वरूपास प्राप्त होईल. तीर्थाजवळ आणखी एक हेमांडपन्थी मंदिर आहे.
सप्तशृंग देविच्या मागील बाजूस थोडे उत्तरेकडे एक अष्टकोणी कुंड आहे. या कुंडातील पाण्याचा रंग तांबडा आहे. देवीने पानाचा विडा खाऊन टाकल्यामुळे पाणी जमिनीचा काही भाग तांबड्या रंगाचा झाला. त्यामुळे या तीर्थाला तांबुल तीर्थ असे म्हणतात. तसेच एक काजल तीर्थ आहे. याचे पाणी काळे आहे देवीने काजळ घातलेले डोळे धुतले म्हणून यास काजल तीर्थ म्हणतात. अशी अख्यायिका आहे. तलावाच्या पश्चिमेस गंगा- यमुना नावाची दोन कुंडे शेजारी शेजारी आहेत. यमुना कुंडाचे पाणी काळेभोर व रूचकर आहे. या कुंडापासून थोडे दक्षिणेकडे गेल्यास पूर्वाभिमुख गणपती मंदिर आहे. पूर्वी वणीकडून गडावर येण्यासाठी याच दगडी पायर्यांच्या मार्गाने गडावर येऊन गणेश मंदिराजवळ विश्रांतीसाठी थांबत असत. तेथे पण दगडात कोरलेले पाण्याचे तळे असून त्याचा वापर पिण्यासाठी करत.
गडावर साग म्हणजे सागाच झाड, नाग म्हणजे फणा असलेला नाग व काग म्हणजे कावळा यांचे अस्तित्व नाही. गडावर सुमारे ६० ते ७० इंच पाऊस पडतो. त्यामुळे गडाच्या परिसरात सागाची जंगले आहे. परंतु सप्तशृंगगडावरील सपाट भुभागात सागाची झाडे अथवा रोपटे आढळत नाहीत. गडाचा परिसर हा जंगल व दर्याखोर्यांचा आहे. त्यामुळे वास्तविक येथे नागाचे अस्तित्व असायला हवे. परंतु येथे नाग आढळून येत नाही. गडावर ४००० नागरिकांची वस्ती असून, मोठ्या प्रमाणावर गायी, म्हशी व इतर प्राणी आहेत, परंतु कावळा आढळत नाही. अलिकडे माञ चार सहा वर्षातून एखाद्या वेळेस काही काळाकरीता काक दर्शन होते परंतु तेही दुर्मीळच.
At. Post. Saptashrung Gad, Kalwan, Dist. Nashik, Maharashtra 423501