आई भगवतीच्या या प्रेमामुळेच तिच्या मुलांनी म्हणजेच भाविकांनी न्यासाच्या कामात सक्रियता दाखवल्याने न्यासाने आत्तापर्यंत यशस्वी वाटचाल केली आहे. विश्वस्त मंडळाच्या स्थापनेपासून सप्तशृंग गडावरील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून श्री भगवतीच्या दर्शनासाठी येणार्या भक्तांच्या सोयीसाठी विश्र्वस्त मंडळाने सुरूवातीपासून दूरदृष्टी ठेवून अनेक योजना मार्गी लावल्या. लोकाभिमुख करीत असलेल्या कामांची पावती म्हणजेच भाविकांनी उदारपणे केलेले सहकार्य होय. जशी जशी कामे वाढत गेली व सुविधा पुरविण्यात येऊ लागल्या तशी भाविकांची गर्दीही गडावर वाढू लागली वर्षभरातून ४५ ते ५० लाख भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे ट्रस्टच्या कामाचा व्याप दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हे कार्य म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे ज्याला हजारो हातांची गरज आहे व वेळोवळी त्याची ट्रस्टला मदत ही होत आहे. भाविकांची मिळणारी सोबत लक्षात घेता न्यासाच्या काही भविष्यकालीन योजना पूर्ण करण्याचा मानस आहे.
मंदिराच्या चढणीच्या आणि मार्गावर कॉक्रिटचे निवारा शेड्स तयार करण्यात आले आहे. ट्रस्टने त्यानुसार उर्वरित परतीच्या रस्त्यावर कॉक्रींट निवारा शेड बांधकाम करण्याचा मानस आहे.
सध्या मंदिरावर असलेल्या पत्र्याचा ढाचा काढून त्याऐवजी सिमेंट कॉक्रिटचा स्लॅब टाकण्याचं काम लवकरच सुरू केले जाणार आहे. यात ओघाने मंदिराचे इतरही सुशोभिकरण केले जाईल. सभामंडप अंतर्गत सुशोभिकरण, विद्युतीकरण, सी.सी.टी.व्ही. यंत्रणा अद्ययावत करणेबाबत कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
नवरात्रोत्सवचा काही काळ हा वर्षाॠतूत येत असल्याने या वेळेस प्रदक्षिणा घालणार्या भाविकांना त्रास होऊ नये यासाठी सुरक्षित असा डोंगर प्रदक्षिणेचा मार्ग येत्या काळात तयार करणेचा मानस आहे.
सप्तशृंग गडाच्या दक्षिण बाजुस सतीच्या कड्याजवळ शिवालय तलाव नावाचे प्राचीन तीर्थ आहे. गडावर येणारे भाविक त्याचा स्नानासाठी उपयोग करतात. त्यामुळे येथे वस्त्रांतर गृह असावे या दृष्टीने वस्त्रातंरगृहाचे काम करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे शिवालय तलावावर आर.सी.सी. शेड्स उभारणे, भाविकांना बसण्यासाठी बाकांची व्यवस्था करणे, आजूबाजूच्या परिसरात वृक्ष लागवड करणे, स्नान गृह व स्वच्छता गृह तयार करणे इत्यादी काम विश्र्वस्त मंडळाने हाती घेतले असून सदर बांधकामास लवकरच सुरूवात करण्यात येणार आहे.
सप्तशृंग देवी व मार्कण्डेय ॠषी यांचा पौराणिक संबंध असल्याने गडावर येणाऱ्या भाविकांना मार्कण्डेय पर्वतावर जाऊन मार्कण्डेय ॠषींचे दर्शन घ्यावे असे वाटते. परंतु येथे जाण्याचा रस्ता पाऊल वाटेचा व अती खडतर असल्याने ठराविक भाविकच तेथे जाऊ शकतात. यासाठी नजिकच्या भविष्यकाळात हरीव्दार येथील मनसादेविसाठी सुरू झालेला रोप वे सारखा रोप वे गडावर करण्याचा विश्र्वस्त मंडळाचा मानस आहे.
गडावर येणार्या भाविकांना व ग्रामस्थांना वैद्यकीय उपचारासाठी दूरवर नाशिक येथे जावे लागते. आर्थिक क्षमता नसल्यामुळे वेळेवर उपचार करणे शक्य होत नाही त्यासाठी सर्व प्रकारचे रोग निदाण करणे, वैद्यकीय उपचार करणे इ. साठी लवकरच अद्यायावत हॉस्पीटलचे विस्तारीकरण करण्याचे विश्वस्त मंडळाने ठरविले आहे.
नांदुरी ते सप्तशृंगी गड पायी रस्ता विकसित करणेसाठी ट्रस्ट प्रयत्नशिल आहे. या रस्त्याचा विकास करत असतांनाचा वेगवेगळ्या प्रकारचे निवारा शेड्स रस्त्यात जागोजागी पाणपोई, वृक्षारोपण, स्वच्छतागृह तयार करणे या व्यवस्थाही केल्या जातील.
सप्तशृंगी गड व परिसर हा आदिवासी भाग असल्याने म्हणावी अशी शैक्षणिक प्रगती झालेली नाही. या कामाकरीता येथील आदिवासी विद्यार्थांना शिक्षण देणेकामी शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा मानस असून याच शिक्षणातून तांत्रिक शिक्षण देऊन सुशिक्षित तरूणांना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीकोणातून वाटचाल करण्याचे विश्वस्त मंडळाने ठरविले आहे. या मध्ये पॉलीटेकनिक कॉलेज, त्याचबरोबर इंग्रजी व मराठी माध्यमांची प्राथमिक मराठी शाळा हे उपक्रम यामध्ये असतील.
वणीच्या बाजूने गडावर पायी येणार्या भाविकांसाठी दगडी पायर्यांवर रेलींग तयार करण्याचे ट्रस्टने ठरवले आहे. त्याचबरोबर भाविकांना बसण्याकरता निवारा शेड्स तयार करणे पर्यटन स्थळांच्या दृष्टीकोणातून गणपती मंदिराचा विकास करतांना सनसेट पॉंईंट विकसित करणे. तिथे असलेल्या गणेश तलावाचा जिर्णोध्दार करून तेथील पाणी पिण्याच्या उपयोगात आणणे व तेथील पायी चालणार्या रस्त्यांची दुरूस्ती करण्याचा न्यासाचा मानस आहे.
श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर येणाऱ्या भाविकांच्या वाहनाकरता दररोज ५०० ते १००० वाहने उभी राहू शकतील असं सुसज्ज वाहनतळ पाच हेक्टर जागेत तयार करण्याचा ट्रस्टच्या विचाराधीन आहे. या वाहनतळाजवळ स्वच्छतागृह ,उपहार गृह ,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणार आहे. वाहनांच्या सुरक्षिततेसाठी भक्कम अशी सुरक्षा व्यवस्था करण्यात येईल.
शिवालय तलावाजवळ पायी येणार्या भाविकांसाठी डॉरमेट्री पध्दतीचा प्रशस्त हॉल असावा या करता ट्रस्ट प्रयत्न करत आहे. त्या ठिकाणी पायी येणार्या भाविकांनाच राहण्याची व्यवस्था उपलब्ध होईल.
गडावर येणार्या भाविकांना देवीदर्शना बरोबरच येथील निवासाचाही आनंद लुटता यावा यासाठी २००x२०० फुट आकाराचे उद्यान तयार करून त्यात बसण्यासाठी बाकडे, लहान मुलांसाठी खेळण्या तसेच विद्युत व पाणी पुरवठ्याची सोय करणे न्यासाचा मानस आहे.
न्यासाने भक्तांच्या निवासासाठी गडावर सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु बर्याचशा भाविकांची नांदुरी येथे निवासाची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसल्याने गैरसोय होते. त्यासाठी भक्तनिवास बांधकाम करणेसाठी जमीन विकत घेण्याचे ठरविले असून त्याबाबतची कार्यवाही सुरू असून जागा खरेदीनंतर पुढील कार्यवाहिस सुरूवात होईल.
सप्तशृंगी गड हे ठिकाण समुद्र सपाटीपासून ४६०० फुट उंचीवर असल्याने प्रतिवर्षी येथे सुमारे ६० ते ७० इंचावर पाऊस पडतो. परंतु पावसाचे पडलेले सर्वच पाणी खाली वाहून जाते. त्यामुळे प्रतिवर्षी मार्च, एप्रिल, मे महिन्यात सप्तशृंग गडावर भक्तांना पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई भासते. याकरीता वनखात्याच्या जागेत तीन ठिकाणी साठवण बंधारे बांधले तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकेल व गडाच्या सौंदर्यात भर पडेल. यासाठी वनखात्याकडे प्रस्ताव पाठवून मंजुरी नंतर सुरूवात करण्याचे विश्र्वस्त मंडळाने ठरविले आहे.
वरील योजना पूर्ण होणेकरीता आम्हाला आवश्यकता आहे ती आपल्या सोबतीची.
At. Post. Saptashrung Gad, Kalwan, Dist. Nashik, Maharashtra 423501