विश्वस्त संस्थेबद्दल माहिती-

...सप्तशृंगगड संघर्षातून विकास

खडकाळ  वाट... रखरखीत ऊन त्यातून सप्तशृंगगडाकडे जाणारी वाट चुकली तर नाही ना? या विवंचनेत मन गुंतल होतं. पण रस्त्यात गडाच्या दिशेने जाणारी आदिवासी मंडळी भेटली आणि हायंस वाटलं. तो दिवस होता २२ नोव्हेंबर १९७५ हा. या दिवशी गडावर दोन विश्वस्तांच्या साक्षीने लिपिक या पदाकरीता मुलाखत झाली. त्यानंतर पुन्हा घरी परत आलो आणि साधारण सात दिवसांनी फोन आला की, कामावर रूजू व्हा. घरच्या मंडळीनाही अप्रुव वाटलं. आपला मुलगा भगवतीच्या सेवेत रूजू होतोय. घरची शेती भरपूर असतांनाही गडाच्या सेवेचा आनंद मोठा होता. परत मजल दर मजल करत गडावर पोहोचलो संध्याकाळचे ५.३० वाजले होते. गवळी आणि ब्राम्हणांची मोठी घरं आजुबाजुला दिसत होती. मंदिराकडे पाहिल्यावर एक टयुबलाईट लावलेली होती. पत्र्याचं शेड दिसत होत. (एवढच काय ते मंदिराच वैभव) त्या सायंकाळी विश्वस्त दशपुत्रे यांनी चाव्या हाती देऊन कामाची सुरूवात करण्यास सांगितले.

दुसर्‍या दिवशी भव्य देवीच्या मुर्तीच दर्शन घेऊन २०० पानांच्या वहीवर हिशोब मांडण्यास सुरूवात केली. सोबत व्यवस्थापक श्री. प्रकाश वाघ आणि मी अशी दोनच कर्मचारी विश्वस्त संस्थेच्या कार्यालयात काम करत होतो. दिवस ज्या प्रमाणे पुढे सरकत होते. त्याप्रमाणे काही समस्या पुढे ठाण मांडून बसल्या. पहिल्या पायरीवर जावळ काढण्यापासून ते बकरू बळीच्या हक्काचे वाद सुरू होते. शेवटी कोणत्याही गोष्टीकडे समस्या म्हणून पाहिले की ती गोष्ट आपल्याला समस्याच वाटते. या सगळ्या परिस्थितीत आपण थांबाव का? निघुन जाव का?  या प्रश्नांनी मनाचा ताबा घेतला. पण प्रत्येक दिवशीच्या सुर्योदयाने नविन ऊर्जा मिळायची धावत्या घोड्यावर स्वार होऊन त्या दिवसांच काम पूर्ण व्हायचं. या वेगातच मागील बारा वर्षाचा हिशोब तपासुन ताळेबंद तयार केला. तेव्हा कळालं विश्वस्त संस्थेचे वार्षीक उत्पन्न २५,०००/- रुपये इतकं आहे.  हे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत या विचारने पहिल्यांदा विश्वस्त संस्थेच्या कामाची घडी बसायला हवी हे लक्षात आलं. सर्वप्रथम देवीच्या मंदिरात त्रिकाल पुजा नियमित व्हावी यासाठी सुचना दिल्या, त्या अनुषंगाने अंमलबजावणीही झाली. पुरोहित वर्ग नियमितपणे त्रिकालपुजेसाठी पुढे सरसावला. या गोष्टी होत असतांना हे ही तितकचं खरं की, पहिले दोन तीन वर्ष देवस्थानच्या विकासासाठी कोणत्या दिशेने जावं हे काहीच सुचत नव्हतं. या रोजच्या रगाड्यात काही नविन सहकारी कर्मचारी म्हणून कार्यालयात दाखल झाले आणि त्याक्षणी खर्‍या अर्थाने हुरूप आला. आता आम्ही दोघेच नव्हतो तर मदतीला पाच ते सहा सहकारी होते. कोणतही काम कसं कराव हा विचार करण्याकरीता आठ डोकी एकत्र आली होती. त्यामुळे कामाचं वाटप झालं. जबाबदारी निश्चित झाली. या रोजच्या दिनचर्येत दोन विश्वस्तांनी फार मदत केली. त्यामध्ये श्री. आण्णा शास्त्री दातार आणि विश्वस्त संस्थेच्या अकौंटची घडी ज्यांनी बसवली ते श्री. प्रभार वैशंपायन या दोन विश्वस्तांचा उल्लेख नाकारणं हा फारमोठा कृतघ्नपणा ठरेल. रोजचं काम व्यवस्थित होतयं असं लक्षात आल्यावर त्याचा सखारात्मक परिणाम दिसायला लागला. विश्वस्त संस्थेचे देणगीदार वाढले. आता संस्थेचे उत्पन्न १ लाख रूपयांनी वाढल.  हे उत्पन्न दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढत होतं आणि १९८० साली हा आकडा वार्षीक ५ लाखावर जाऊन भिडला आणि उत्साह वाढला.

देवस्थानच्या या कारभारात माझ्याकडे नंतर व्यवस्थापक पदाची जबाबदारी आली. त्यामुळे व्यवस्थापक हा केवळ राजा नसतो तर त्याला सेनापती होऊन सगळीच कामं करणं आवश्यक आहे हे समजलं. अर्थात पहिल्या पासूनच सगळीच कामं करण्याची सवय लागली होती. पण व्यवस्थापक पदावरील व्यक्तिने यशस्वी होणे हे सर्वस्वी कर्मचार्‍यांवर अवलंबून असतं हे समजलं. त्यामुळे देवस्थानच्या विकासातील सगळ्यात मोठ श्रेय मी कर्मचार्‍यांना देईन. कारण ह्याच कर्मचार्‍यांनी पाहुणे आले तेव्हा आपले पद विसरून चहा बनवून पाजला आहे. देवस्थानच्या खोल्यांची साफसफाई केली एवढचं नाही तर शौचालयांची स्वच्छता केली. मला असं वाटत की आमच्या कर्मचार्‍यांनी या देवस्थानाकरीता काय मेहनत घेतली आहे हे सांगण्याकरीता वरील उदाहरणांनतर वेगळ सांगायला नको. आज सप्तशृंगगडावर जी भक्तनिवास बघताय ती ठेकेदाराने बांधली आहेत. पण पूर्वी असलेल्या वास्तुकरीता नांदुरीपासून गडापर्यंत पायी वाळु आणि सिमेंट वाहुन आणण्याचं कामही कर्मचार्‍यांनी केलंय नविन खोल्या उभारतांना आमच्या कर्मचार्‍यांचा घाम त्यात मिसळला आहे. अर्थात हे सगळ करण्याकरीता जी ताकद दिली ती आई भगवतीने. त्यामुळे मी म्हटलं की आज ते कौतुक वाट्याला आलं ते केवळ या कर्मचार्‍यांमुळेच....

मी आपल्याला सुरूवातीलाच सांगितलं की, जेव्हा गडावर मोजकीच गवळी आणि ब्राम्हणांची घरंही इंथ होती. या काळात गडावरील विविध ॠतू अंगावर घेतांना ज्या ब्राम्हण कुटूंबातील घरातील मला घरापर्यंत प्रवेश देऊन मायेने दोन घास भरविण्याचं काम केलं ते दिक्षित आणि देशमुख कुटूंबियांनी या कुटूंबाचे उपकार मानावे तेवढे कमी आहेत. कोणताही कर्मटपणा न बाळगता अर्थात हा कर्मटपणा या दोन्ही कुटूबांच्या लोकांमध्ये नव्हताच म्हणुनच तर आम्हा सगळ्यांनाच या पुरोहितांनी मांडीवर घेतलं होतं आणि आजही आमच्यावरच प्रेम कायम ठेवल आहे.

रोजच्या जगण्याला मायेची किनार तयार होत असतांना कधी निघुन जाण्याचा विचार आला असेल तर पहिले चेअरमन श्री. जयाजीराव जामदारांनी समजुत काढून थांबवून घेतल. दुसरे चेअरमन श्री. सासवडकर साहेबांनी मुलासारखा जिव लावला आणि वेळोवेळी सगळ्याच चेअरमनांनी आत्तापर्यंत खुप मदत केली. या उमेदीच्या काळात जी मंडळी मार्गदर्शक म्हणून लाभली, आणि पहिल्या पाच वर्षात जी जडणघडण झाली त्यावरच पुढे आम्ही सगळेच तरलो. आज लाखोंच्या संख्येने भाविक गडावर हजेरी लावतात पण १९८१ ते ८२ चा काळ म्हणाल तर वर्षभरात ६० हजार भाविकांनी जरी हजेरी लावली तरी मोठी यात्रा पार पडली अशी चर्चा व्हायची. कालांतराने सप्तशृंगीगडावर भाविकांची खरी गर्दी वाढली ती नांदुरी ते सप्तशृंगीगड रस्ता तयार झाला तेव्हा डांबरी रस्ता तयार झाल्याने सप्तशृंगी देवी खांदेशा पुरती मर्यादित न राहता अवघ्या भारताची झाली. देशभरातून भाविकांचा ओघ गडावरती  वाढला त्या बाबत सार्वजिनक बांधकाम विभागाचे आभार मानायला हवेत. कारण अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत बीओटी तत्वावर हे काम पूर्ण झालं संघर्षातील झीज ही केवळ शारिरिक नाही तर मानसिक पातळीवरही आहे. त्यामूळे कितीही अडचणी आल्या तरी थांबायच नसतं. शिवाय ठराविक परिस्थितीवर समाधान मानायचं नाही हा निश्चय मनाशी ठेऊन गडाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी देवीची पालखी काढण्याच ठरवलं थेट गुजरातमध्ये धडक मारली. खासकरून सुरत वासियांनी खुप जल्लोषात स्वागत केलं. महाराष्ट्रात इतर ठिकाणीही जाणं झालं, पण सुरतशी जे नात निर्माण झालं ते अभुतपूर्व होत या नात्यात दादुभाईंनी गडावर १९८२ च्या काळात भक्तनिवास (आत्ताचा सुरत निवास) बांधण्याकरीता दहा हजार रूपयांची मदत केली. त्यामुळे दानपेटीतील रकमेची मोजणी करतांना पंचवीस पैशांचे ठोकळेही हिशोब चुकू नये म्हणून व्यवस्थीत मोजावे लागत होते. अशी परिस्थिती होती. दादुभाईसारख्या सुरतमध्ये असणार्‍या मराठी माणसाने परिस्थिती नसतांनाही एवढी मोठी रक्कम देऊ केली केवळ भगवतीचा भक्त म्हणून. पण दादुभाईंनी एवढ्यावरच समाधान न मानता सुरतमध्ये ठिकठिकाणी भक्तांच्या सभा घेऊन देणग्या गोळा केल्या. देवस्थानाकरीता भक्त जोडले. गडावरील भव्य सुरत निवासचं रूप साकारण्यांत दादुभाईंचा सिंहाचा वाटा आहे. सुरतमध्ये न्यासाच्या कुठल्याही कर्मचार्याला हक्काचं घर जर असेल तर ते दादुभाईंचं होतं. पण आज दादुभाईं आमच्यात नाहीत त्यामुळे आम्हा सगळ्यांना पोरकं झाल्यासारखं वाटतय. दादुभाईंच्या रूपानं आमचं मातृत्व हरपलं आई भगवती त्यांच्या आत्म्यास शांती देवो हिच प्रार्थना.

आमच्या संघर्षाच्या वाटेत दादुभाईं प्रमाणे पुण्याचे उदयेसिंग कुदळे ज्यांनी कुदळे निवास उभं केलं त्यांचीही साथ लाभली. त्याचबरोबर डी.एस. कुलकर्णी सप्तशृंगी भक्त मंडळ (सुरत), राम भक्त परिवार, मुंबईचे चंद्रकांत शेठ, पुण्याचे विजय फडणीस व असंख्य भाविक ज्यांची सोबत आयुष्यातील सगळ्याच ॠतुत राहीली. या सगळ्या मंडळींचे  आभार मानण्यापेक्षा त्यांच्या ॠणांमध्ये राहण मला अधिक आनंददायी वाटतं. शेवटी भगवतीला वेगवेगळ्या सेवा या भक्तांकडून करून घ्यावयाच्या होत्या. गडाच्या विकासाच्या प्रतिक्षेत सगळ्याच सुखसोई पुरविण्याचा आम्ही सगळ्यांनीच पयत्न केलायं. चैत्रच्या रखरखत्या ऊन्हातला भाविक पूर्वी नारळाचं पाणी पिऊन तहान भागवायचा, पण आज त्याची आजची तहान खालून वरती आलेल्या साठवण बंधार्‍यातील पाण्याचे भाग्य हे सुखदाई म्हणाव लागेल आज भवानी टँकमधल पाणी यात्रेपुरतं भरपूर पुरतंय, याबाबत ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीची भरपूर मोठी मदत आहे. या प्रवासात १९९४ साली झालेला टँकर अँक्सिडेंट, २००८  साली मंदिरावर पडलेली दरड, त्याच प्रमाणे घाटात झालेला मुंबईंच्या बसचा अपघात ह्या घटना मनाला चटका लाऊन गेल्या या दुखदायी घटना विसरता येण्यासारख्या नाहीत. पण या दुखांत प्रत्येक कर्मचार्‍याच्या कुटुंबियांनी जी सोबत केली ती कौतुकास्पद आहे. कोणतीही तक्रार कोणाच्याही कुटूंबाने कधी केली नाही कारण प्रत्येक क्षणामध्ये जगण्याची ताकद भगवतीने सगळ्यांना दिली होती. आत्तापर्यंत सगळ्यांची सोबत मिळाली आणि यापुढेही मिळणार या वेळी मनातली एक आठवण आपल्याला सांगाविशी वाटते. १९९४ साली जेव्हा मंदिरावर कलशरोपण करण्याकरता टोकावर पोहोचलो, तेव्हा उंचावरून सप्तशृंगगड पाहतांना गड आता बदलला आहे. हे प्रकर्षाने जाणवलं पण जेवढ्या उंचीवरून हा गड मी पाहिला तेवढ्याच विकासाच्या उंचीवर या देवस्थानाला न्यायला हवं हा विचार मनात आला. हा विचारच आपलं आणि सगळ्यांचं पु़ढचं पाऊल असेल असा निश्चय करू यात. भगवतीला साकडं घालुयात नाही म्हणावया आता असे करूयात प्रणात चंद्र ठेवु हाती उन्हे धरूयात आयुष्य तेच आहे आणि हाच पेच आहे तु भेटशी नव्याने  बाकी जुनेच आहे.

श्री सुरेश निकम, माजी व्यवस्थापक, श्री स. नि. देवी ट्रस्टAt. Post. Saptashrung Gad, Kalwan, Dist. Nashik, Maharashtra 423501

contact us